Monday, January 8, 2024

AKKUA - आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन

सर्व उद्योजकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा 'मेसेज' खरं म्हणजे मला 1 जानेवारीलाच पाठवायचा होता, परंतु नवीन वर्षाच्या शुभेच्छा मध्ये हा मेसेज हरवून जाईल, म्हणून चार-पाच दिवस जाऊ दिले. आगरी कोळी कराडी उद्योजकांनी एकत्र येऊन व्यवसाय,उद्योगात प्रगती करावी, एकमेकांना मदत/सहकार्य करत व्यवसाय वृद्धी करावी, समाजातील पैसा समाजात रहावा.. यासाठी सर्व उद्योजकांनी एकत्र यावे, आपल्या समस्या एकोप्याने,  एकत्र येऊन सोडवाव्यात यासाठी AKKUA म्हणजेच आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन ची आपण सर्व मित्रमंडळींनी स्थापना केली. एकीचे बळ मिळते फळ ह्या उक्तीप्रमाणे, एकत्र आलो तर अनेक समस्या चुटकी सरशी सुटतील अशी सर्वांचीच आशा आहे. परंतु सर्वांना एकत्र कोण करणार ?  कोणत्या कारणासाठी सर्वजण एकत्र येणार? आणि मी या संघटनेत सामील झालो तर मला काय मिळणार ? माझ्या व्यवसायात कशी वाढ होणार ?  असे एक ना अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले असतील,  आणि त्यामुळेच आपला व्यवसाय भला आणि आपण भले ..! हा विचार घेऊन अनेक उद्योजक चालत राहतात. त्यामुळे उद्योजक हे सहसा समाज, संघटना, समाजकारण, राजकारण किंवा अशा प्रकारात ते उत्साह दाखवत नाहीत,आणि त्यामुळे संघटना स्थापन होऊन दोन वर्षात आपण व्हाट्सअप ग्रुप वरील 350 सदस्य ते सुद्धा Reference ने मिळालेले इथपर्यंत मजल मारली..! 350 लोकांचा व्हाट्सअप ग्रुप वर जाहिरात करून एखादं काम मिळालं तर उत्तम किंवा रेफरन्स साठी असले ग्रुप पाहिजे असतातच,  त्यातलाच एक ग्रुप म्हणून अनेकांनी याकडे पाहिले सुद्धा असेल. अर्थात संघटना म्हणून काही ठोस करायला आपल्याला जमलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही..!  आणि म्हणून हे जमणार च नाही असेही नाही ..! आपण व्यावसायिक आहोत, सुरुवातीला अपयश येतच ..ती यशाची पहिली पायरी आहे..!  त्यामुळे टिकून राहणे हे खूप महत्त्वाचा असतं. आणि कसल्याही परिस्थितीत संघटना दोन वर्षे टिकून ठेवली ..याच श्रेयही आपल्या सर्वांनाच ..!! 
2024 हे वर्ष प्रचंड उलथा पालथी चे वर्ष असणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका या वर्षात होतील राजकारणाने हा देश ढवळून निघेल राजकारण हा एकमेव व्यवसाय आहे की काय अशी परिस्थिती होईल अनेक व्यवसाय निर्माण होतील,  काही नष्ट ही होतील. अनेक नवीन संधी निर्माण होतील.  काळाच्या ओघात हे सुरूच राहणार ..! 2024 याला अपवाद असणार नाही. परंतु या गदारोळात एकटा व्यवसायिक टिकेल की नाही ही शंकाच आहे. त्यामुळे  संकटांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हावे लागेल,  छोट्या मोठ्या अनेक व्यवसायिकांची, उद्योजकांची मोट बांधावी लागेल. आपण हे करण्यात यशस्वी झालो, तर सर्वांचंच भलं होईल,सर्वांनाच त्याची फळ मिळतील..!  आणि नाही झालो,  तर प्रत्येकाच आपल  स्वतंत्र आयुष्य आहेच. जगऱहाटी सुरूच राहते त्याप्रमाणे सर्व काही आहे तसेच चालत राहील. परंतु आपण उद्योग व्यवसायात यशस्वी झालो, आर्थिक स्वातंत्र्य आलं, तर आपल्याला बघून चार जण अजून उद्योग धंद्यात आले, समाजात एक उद्योग चळवळ सुरू करण्याचे श्रेय आपल्याला मिळालं,  संपूर्ण समाजा मध्ये आर्थिक साक्षरता आली तर चित्र बरचसं बदलेल..! आणि हो, केंद्र आणि राज्य शासनाच्या अगणित योजना उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी आहेत पण आपण त्याची माहिती घेणं तर सोडाच कधी त्यांचा फायदा घेण्याचा विचारही करत नाही याउलट कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात मात्र त्यांचा भलाभक्कम फायदा त्या त्या भागातली लोकं करून घेतांना दिसतात !म्हणून मित्र हो, थोडा वेळ काढा आणि AKKUA  मध्ये सामील व्हा ..! आपण सर्वजण बिझी आहेत,  आम्ही सुद्धा..!  परंतु जर आपण संघटितपणे, एकत्र येऊन, एकमेकांना मदत करत प्रत्येकाचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली तर यासारखे दुसरा आनंद नाही ..! पुढे अजून व्यवसाय बद्दल लिहीतच जाईन..!  हा लेख फक्त AKKUA साठी लिहिला..! सर्वांना एकच विनंती उद्योगाची कास धरा..!  आर्थिक स्वतंत्र व्हा..!  आणि AKKUA मध्ये सामील व्हा..!  धन्यवाद ..!

Thursday, August 3, 2023

पैसा आणि आनंद

पैसा मिळवण्याच्या नादात, माणसं मिळवायचे राहूनच जातं..!  पैशबरोबर माणसं ही जोडत जायचं..कारण हीच मिळवलेली माणसं तुम्हाला पैशाने विकत घेता येणार नाही अशी काही गोष्टी मिळवून देतात..!  शेवटी आयुष्य तुम्ही कोणत्या फूटपट्टीने मोजता, यावर सर्व काही अवलंबून आहे. ती फुटपट्टी पैसा आहे की आनंद ..? पैसा ...दाखवता येतो, मिरवता येतो... आनंद मात्र असं काही करत नाही..!  पैसा बाह्य आहे आणि आनंद ही आतली गोष्ट आहे..!  पैसा उपभोगाची वस्तू आहे तर आनंदही अनुभवाची भावना आहे ..! Finally , पैशातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही भ्रमात आहात .! पैशातुन फक्त सुख मिळत, आनंद नाही..!  पैसा एका क्षणाला निरोपयोगी आणि बोथट होऊन जातो..! जिथून पैशाचं काम संपत ..आनंद तिथून सुरु होतो..!! 
- संजीवन म्हात्रे. 
थोडं जनातलं थोडं मनातलं 

Thursday, May 18, 2023

थोडं मनातलं -001

नमस्कार ! 
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे … उन 'मी ' म्हणतंय … सकाळी १० वाजल्यानंतर बाहेर जाणं जिकिरीच झालय … अंगाची काहिली होतेय … उष्णतेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळालेय … अशा वेळी समुद्रात , नदीत , तलावात , डुंबायला मिळालं  तर …! फक्त आठवणीनेच बरं वाटलं ना … आयुष्याचं  पण असच आहे … जेव्हा सर्व बाजूनी दु:ख , समस्या तुम्हाला घेराव घालतात … दु:खाचं रणरणत उन सुरु होतं …तेव्हा सुखाचे पावसाळे आठवायचे … मस्त सुखातील क्षण आठवायचे … आठवणींचा उपयोग यासाठीच  तर करायचा असतो …वाइट आठवणीना 'डिलीट ' मारून … चांगल्या क्षणांना 'स्पेस' द्यायचा असतो … ! असो … थोड्याच दिवसात मस्त पावसाला सुरुवात होईल अशी आशा  करू या …! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे
#संजीवनम्हात्रे #यालतरहसाल #सुपरस्पिकर #संजीवनमार्ग

Thursday, August 11, 2022

गट्टी - छोट्यांवरोबर

कार्यक्रम कुठे हि असू दे..कोणताही तालुका , जिल्हा... माझी लहानग्यांशी लगेच गट्टी जमते ..! banner वरअसलेल्या चेहऱ्याचा माणूस त्यांच्याशी बोलतोय याचे त्यांना खूप कुतूहल असते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद , विस्मय, आणि एक मस्त निरागसता असते.  ती मला मोहित करते. मी त्यांच्यात माझं बालपण शोधतो ..स्वत:ला त्यांच्यात बघतो..कदाचित  एक मोठा कलाकार त्यांच्यात दडलेलाअसेल..! पहिल्यांदा ते घाबरतात, बुजतात, आयोजक त्यांना ' ए पळा रे..इथून..असे म्हणत दूर करण्याचा प्रयत्न करतात..पण मी स्वतःच त्यांच्यात रमतो...हळूहळू  ती मुलं मस्त बिनधास्त होतात..शाळेतल्या कविता..सॉरी पोएम बोलतात...आणि याल तर हसाल च्या अगोदर मस्त एक छोटासा कवितांचा कार्यक्रम होतो...हळूच ते चेष्टा मस्करी करत गावातल्या बऱ्याच गोष्टी मला सांगतात.... सुचवितात..आणि मी कार्यक्रमाच्याअगोदर मस्त 'pure' होतो. त्यांची निरागसता आणि तरीही कुणालाही न दुखावणारा मिस्किलपणा खोडकर वृत्ती कार्यक्रमातआणण्याचा प्रयत्न करतो..!
.गुलजारसहजलिहूनजातात...
ए जिंदगी ..तू मेरा बचपन छीन सकती है...
..............मेरा बचपना नही....!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, December 16, 2021

डिसेंबर


नमस्कार ..!
डिसेंबर म्हटलं कि जरा Relax व्हायचं ....शांत होऊन जरा सरलेल्या वर्षाकडे पहायचं...काय चुकलं ..काय बरोबर ...याचं गणित मांडायचं ...आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी पुन्हा स्वप्नांची यादी गुंफायची ...वाईट मोडीत कडून चांगलं जोडीत जायचं ...आणि भूतकाळाला विसरत ...भविष्यकाळाला सजविण्यासाठी ...वतर्मानात जगायचं ....एवढं साधं सरळ ..आयुष्याचं गणित  ...अभ्यासक्रम तोच प्रत्त्येकाचा ...पण प्रश्नपत्रिका वेगळी सर्वांची ...कॉपी नाही करता येत आयुष्याच्या परीक्षेत ..म्हणून सामोरं जायचं सर्व सुख;दु:खाना  ......आणि तेच ...जरा RELAX राहायचं ...!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, March 14, 2021

दृष्टी


नमस्कार ..!! 
जीवनाचा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे, क्रूरतेकडून मानवते कडे , अभावातून संपन्नतेकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे आहे. जीवनाची हा दिशा आहे. आपलं जीवन उलगडून बघा...थोडं मागे वळुन... जर या विपरीत असा प्रवास सुरु असेल तर वाट चुकली आहे किंवा प्रवास सुरु आहे ही भ्रांत आहे . ..मागे वळून एकदा पाहायला काय हरकत आहे ..!! अनेक तेजस्वी किरणे घेऊन, आपल्या सौंदयाची उधळण करत , अनेक संधी , माणसं आपल्या बाजूला सतत  उभी करत , जीवनाची अनेक ध्येय तो आपल्यासमोर ठेवत असतो ...हे सर्व पाहण्याची, जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची दृष्टी नसेल तर सारं व्यर्थ ..!! म्हणून ही सम्यक दृष्टी विकसित करावी लागेल आणि त्यासाठी डोळे नाही तर मन:चक्षु उघडावे लागतील ..!! #थोडंअध्यात्मिक 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Sunday, September 20, 2020

बोलणं खुप महत्वाचं ..!!


नमस्कार ..!! 
बोलणं खुप महत्वाचं..! सध्याच्या रोजच्या परिस्थिती वर काय बोलणार ? सगळं काही बोलण्याच्या पलीकडचं सुरू आहे ...एका अनामिक भीतीच्या छायेखाली आपण वावरतोय ..!! 2019 मध्ये ही भीती नव्हती..की कुणीतरी दबा धरून बसलाय तो तुमचा जीव घेईल..!! बरं तो जीवघेणा आहे की नाही हे ही नक्की माहीत नाही ..तो जीव घेतोय की एका सिस्टिम ला आपण बळी पडतोय ..!! काय चाललंय कळत नाही...! यामुळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,मानसिक बदल घडताहेत ..या  सर्व बदलांना एकत्रितपणे सामोरे जाताना घुसमट होणे अनिवार्य आहे , स्वाभाविक आहे ..!! म्हणून व्यक्त व्हा,बोला ...ऐकून घेणार कुणी असेल तर फारच छान..!! प्रेशर कुकर सारखा 'सेफ्टी व्हॉल्व्ह' पाहिजे मनाला  ..!! ऐकून घेणार कुणी नसेल तर स्वतःशीच बोला, बोलता येत नसेल तर लिहा, कागदावर उतरवा...बघा..हलकं झालेलं मन भविष्याकडे बघत ...पॉझिटीव्ह विचारांचा मागोवा घेतं ..!! 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे